भडगाव (जि. बुलडाणा): व्यसन वाढले की, संपूर्ण कुटुंबाची दुरवस्था होते. त्याची सर्वात मोठी झळ कुटुंबातील महिलांना बसते. त्यामुळे एका वर्षापूर्वी संपूर्ण गाव व्यसनमुक्त करण्यासाठी बुलडाणा तालुक्यातील भडगाव येथील महिलांनी पुढाकार घेतला. व्यसनमुक्त महिला मंडळाची स्थापना ५ जुलै रोजी करण्यात आली होती. या महिला मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण गावासह परिसरातील गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, व्यसनापासून दूर राहण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. बुलडाणा तालुक्यातील भडगाव येथील महिलांनी एक वर्षापासून गावात केलेली दारूबंदी व अन्यायाविरुद्ध लढण्याच्या निश्चयाने कार्य करीत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बावस्कर यांना कळल्याने त्यांनी या कार्याची दखल घेत भडगावला भेट दिली. त्यावेळी एएसपी श्वेता खेडकर, डीवायएसपी समीर शेख, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गावंडे व कर्मचारी ५ जुलै रोजी हजर झाले. तुम्ही कामात सातत्य ठेवा, विजय निश्चित होतो, असे सांगून भडगाव हे आदर्श गाव म्हणून यावेळी पोलीस अधीक्षक बावस्कर यांनी घोषित केले.
व्यसनमुक्त गावासाठी महिलांचा पुढाकार
By admin | Updated: July 7, 2015 00:02 IST