बुलडाणा : जिल्ह्यात २0१६-१७ या खरीप हंगामात ७ लाख ४९ हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचे उद्दिष्ट असून, बियाणे व खतांचे राज्य स्तरावरच प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी आज झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुक्यात रोहित्र भवन उभारण्यात येणार असून, यावर्षी शेतकर्यांना निमकोटेड युरिया पुरविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जि. प अध्यक्ष अलका खंडारे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोद्रें, संजय रायमुलकर, पांडुरंग फुंडकर, आकाश फुंडकर, डॉ. शशिकांत खेडेकर, जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, पालक सचिव श्याम गोयल, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.कृषी योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचण्यासाठी दोन गाव मिळून कृषिमित्रांची निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषिमित्रांची निवड लवकर करावी. त्यांनी नेमून दिलेल्या गावात कृषी योजनांची माहिती शेतकर्यांना द्यावी. कृषिमित्रांचे मानधन शासन १ हजार रुपये करणार आहे.
निमकोटेड युरियाचा पुरवठा करणार!
By admin | Updated: April 23, 2016 02:23 IST