बुलडाणा : उच्च शिक्षित, व्यावसायिक पदविधरांना शासनस्तरावर अधिकाधिक सुविधा व बेरोजगार पदविधरांच्या स्वावलंबनला प्राधान्य देऊन त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाही गृह, नगरविकास, विधी राज्यमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील यांनी दिली. भाजपचे युवा नेते संजय चेके पाटील व बुलडाणा शहराध्यक्ष अमोल बल्लाळ यांच्यावतीने बुलडाणा येथील रेणुका मंदिराच्या सभागृहात २१ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पदविधर स्नेहमेळाव्यात ना.रणजीत पाटील बोलत होते. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ.विकास बाहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पदविधर आणि शिक्षकांच्या समस्यांची आपणांस जाणिव असून, सक्तीच्या शिक्षण कायद्यावर पुनर्विचार व्हावा, यासाठी आपण केंद्र शासनाकडे प्रयत्न करणार असल्याचेही ना.पाटील यांनी सांगितले. सोबतच विद्यार्थ्यांंना ८ वी पर्यंंत परीक्षाविना ढकलत नेण्याच्या धोरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. मेळाव्याचे आयोजक संजय चेके पाटील यांनी युवक वर्ग पदविधरांच्या विविध समस्यांचा उहापोह करून प्रशासकीय सेवेत विदर्भाचा टक्का वाढविण्यासाठी ना.डॉ.पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना किमान तालुकास्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची उभारणी करून जिल्हा रोजगार-स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या माध्यमाने मोठय़ा खासगी कंपन्यांची नोकर भरती करण्यासाठीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक मेळाव्याचे संयोजक डॉ.विकास मिसाळ यांनी केले. प्रसंगी डॉ.लद्धड यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.
पदविधरांच्या प्रगतीला प्राधान्य देणार - पाटील
By admin | Updated: February 24, 2015 00:17 IST