मयूर गोलेच्छा लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार (जि. बुलढाणा) : शहरातील नाल्यांतून येणारे सांडपाणी जगप्रसिद्ध लोणार सरोवरात मिसळत असल्यामुळे जलरंग, रासायनिक गुणधर्म आणि परिसरातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका व्यक्त होत आहे. अशात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सरोवरातील पाणी पातळी सुमारे ४ फुटांनी वाढली असून, सरोवराच्या जैविक आणि ऐतिहासिक पर्यावरणाला धोका पोहोचण्याचा धोका स्थानिक पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक महत्त्व, जैवविविधता संशोधनासाठीही उपयुक्त १० ते ११ पीएच असलेले अल्कलाइन पाणी आणि उल्कापातामुळे निर्माण झालेले हे विवर जागतिक स्तरावर दुर्लभ मानले जाते. येथे आढळणारी जैवविविधता केवळ स्थानिकच नाही, तर वैज्ञानिक संशोधनासाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे सरोवराच्या संरक्षिततेबाबत गंभीर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नैसर्गिक हरित-निळसर पाणी झाले गढूळ अन् मळकट नाल्यांतून प्लास्टिक कचरा, सांडपाणी थेट सरोवरात जात असल्याचे स्थानिकांनी निरीक्षण आहे. त्यामुळे सरोवराचे नैसर्गिक हरित-निळसर पाणी आता गढूळ आणि मळकट दिसत आहे. यामुळे पाण्याचा पीएच स्तर आणि रासायनिक रचना बदलण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम येथील जैवविविधतेवर होऊ शकतो.
मंदिरापर्यंत पोहोचले पाणी सरोवराच्या दक्षिण-पश्चिम दिशेकडील कमळजा मातेच्या मंदिरापर्यंत पाणी पोहोचले, मंदिर परिसरातील पायवाट पाण्याखाली गेली. २०२३ मध्ये मंदिरासमोरील वाघाच्या चौथऱ्याला पाणी लागले होते; यंदा पहिल्या पायरीपर्यंत पाणी पोहोचले आहे. सरोवर केवळ नैसर्गिक, धार्मिक ठेव नाही, तर शास्त्रीय दृष्टिकोनातूनही भारतासाठी अत्यंत मौल्यवान ठिकाण आहे. सांडपाणी वेगळ्या मार्गाने वळवणे आणि सरोवराच्या रचनेचा सातत्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे.- सचिन कापुरे, सदस्य, मी लोणारकर