खामगाव : पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले मात्र आज येईल, उद्या येईल या भाबड्या आशेने शेतकरी दररोज आभाळाकडे पाहत आहे मात्र पावसाचा पत्ताच नसल्याने उगवलेले पिक आता धोक्यात आले आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्यामुळे दमदार पावसासाठी बळीराजाची आर्त हाक सुरु झाली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकर्यांनी सरतेशेवटी नाईलाजाने पाऊस येईलच या आशेने पेरणी केली. खामगाव तालुक्यात १00 टक्के पेरण्या आटोपल्या असून पिकेही निघून आलेली आहेत. २२ व २३ जुलै रोजी पडलेल्या पावसाच्या आशेवर शेतकर्यांनी पेरण्या केल्या. या पावसाच्या ओलीवर कशीबशी पिके उगून आली खरी, मात्र पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आहे. खामगाव तालुक्यामध्ये ९ मंडळ असून प्रत्येक मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविली आहेत. यामुळे मंडळनिहाय पावसाची मोजमाप करणे शक्य होत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रापासून पुरेसा पाऊस झालाच नाही. परिणामी शेतकर्यांना उशिरा पेरण्या कराव्या लागल्या. कपाशी, सोयाबिन, मुग, उडीद, मका, ज्वारी, तूर या प्रमुख पिकांचा पेरा झालेला आहे. आतातर पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. उन्ह तापत असल्याने दुपारच्या वेळेस पिके अक्षरशा सुकलेली दिसत आहेत. येत्या काही वर्षात पाऊस नाही पडला तर खरीप हंगाम वाया जाण्याची दाट शक्यता आहे.*विहिरींची जलपातळी तळालातालुक्यात आतापर्यंत केवळ १४९.३0 मि.मि.सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत दमदार पाऊस पडला नसल्याने नदी नाले दुथळी भरुन वाहलेच नाहीत. विहिरीवरील पाण्यावर शेतकर्यांनी कपाशी तसेच इतर पिकांना पाणी देणे सुरु केले आहे. मात्र दमदार पावसाअभावी जलपातळीत दिवसेंदिवस घट होत असल्याचे दिसून येते आहे. वरुणराजा रुसून बसल्याने जमीनीला पावसाची ओळ लागली आहे. मात्र पाउसच नसल्याने विहिरींची जलपातळीही तळाला लागली आहे. त्यामुळे रब्बीची पिकेही धोक्यात आली आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील पिके सुकण्याच्या मार्गावर
By admin | Updated: August 14, 2014 23:47 IST