लोणार : तालुक्यातील सुलतानपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड याेद्ध्यांच्या लसीकरणाला सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. आता लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. परंतु, लोणार शहरात मात्र अजूनही लसीकरण केंद्र सुरु होऊ शकलेले नाही. त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना अद्यापही लसीकरणाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
कोरोना लसीकरण केंद्र केवळ सरकारी रुग्णालयात किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयातच सुरु करावे, असे केंद्रीय आरोग्य विभागाचे आदेश आहेत. लाेणार तालुक्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत संलग्न असणारे एकही खासगी रुग्णालय नसल्याने कोरोना लसीकरण केंद्र खासगी रुग्णालयात सुरु करण्यात अडचणी येत असल्याची माहिती आरोग्य विभागातील सुत्रांनी दिली. तालुक्यात लोणार व बीबी येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने या दोन्हीपैकी एका ठिकाणी लवकरच कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, हा लसीकरण केंद्राचा मुहूर्त केव्हा निघणार, याकडे ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष लागले आहे. या लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक असून, यासाठी कोविड ॲपमध्ये माहिती भरून देणे अनिवार्य आहे. परंतु, सर्वसामान्य जनतेला मात्र या ॲपविषयी जास्त माहिती नसल्याने नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत तर सुलतानपूर येथील लसीकरण केंद्रावर तुरळक प्रमाणात ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी जात आहेत. त्याठिकाणी लसीकरणासाठी नोंद करून लसही देण्यात येत आहे. परंतु, लोणार शहरात जर लसीकरण केंद्र सुरु झाले तर ज्येष्ठ नागरिकांना सोईस्कर होईल. त्यामुळे लवकरात लवकर शहरात लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.