चिखली (जि. बुलडाणा): स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर मनसेच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवात ध्वनी प्रदूषणाची सर्व मर्यादा धाब्याबर बसवून कायद्याचे उल्लंघन करणार्या नागपूर येथील डी. जे. सेटधारकावर चिखली पोलिसांनी कारवाई करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन हजारांचा दंड ठोठावला आहे. दहीहंडीचा उत्सव आणि डीजेचा आवाज हे समीकरण होऊन बसले आहे. दहीहंडीत डीजे नसेल तर काही तरी चुकल्यासारखे वाटत असल्याने दहीहंडी उत्सवाच्या काळात डीजेला फार महत्त्व आले आहे; परंतु यंदा दहीहंडी तसेच ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिसांच्या कडक भूमिका शिवाय दुष्काळीस्थिती यामुळे दहीहंडीचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्या चिखली शहरात केवळ मनसेचा एकमेव दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर मनसेच्यावतीने आयोजित या दहीहंडी उत्सवासाठी नागपूर येथील संतोष रमेश बडेट्टीवार वय ३४ वष्रे रा.गुरूदेव नगर यांचा डी.जे. लावण्यात आला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात दिलेल्या आदेशाची पायमल्ली यानुषंगाने डी. जे. सेटधारकाकडून झाल्याने चिखली पोलिसांनी पीएसआय जी.डी.भोई यांच्या फिर्यादीवरून संतोष बडेट्टीवार यांच्या विरोधात मुंबई पो.का.३३३ (ढ), १३१ (उ) नुसार कारवाई करून कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने बडेट्टीवार यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आवाजाची मर्यादा ओलांडली!
By admin | Updated: September 9, 2015 02:12 IST