बुलडाणा : तालुक्यातील ६६ पैकी ५१ ग्रामपंचायतींची निवडणूक हाेत असून, या निवडणुकीत गावपुढाऱ्यांचा कस लागणार असल्याचे चित्र आहे. पदावर असलेले पदाधिकारी आपआपल्या गावातील राजकीय हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तालुक्यातील ५१३ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. तालुक्यातील १लाख ४९ हजार ६४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बुलडाणा तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. त्यासाठी गावागावात राजकारण तापल्याचे चित्र आहे. तालुक्यात १८१ प्रभागासाठी ही निवडणूक हाेणार असून, २३८ मतदान केंद्र राहणार आहेत. तालुक्यातील अजिसपूर, अंभाेडा, भडगाव, भादाेला, बिरिसंगपूर, बाेरखेड, चांडाेळ,चाैथा, दहीद बु., दहीद खु., देवपूर, देऊळगाव, धाड, धामणगाव, दुधा, डाेमरुळ, डाेंगरखंडाळा, गुम्मी, हतेडी बु, जांब, जामठी, जनुना, केसापूर, खुपगाव, काेलवड, कुलमखेड, कुंबेफळ, मढ, माळविहीर, माळवंडी, म्हसला बु., मासरुळ, माला, नांद्राकाेळी, पाडळी, पळसखेड भट, पळसखेड नागाे, पांगरी, रायपूर, रुइखेड टेकाळे, सागवन, साखळी बु., सातगाव म्हसला, सावळी, शिरपूर, सिंदखेड, साेयगाव, तांदूळवाडी, तराडखेड, वुरड आणि वरवंड आदी ग्रामपंचातींचा समावेश आहे. गुलाबी थंडीत गावागावात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. प्रस्थापितांबराेबरच युवकही रिंगणात उतरणार असल्याने गावपुढाऱ्यांसमाेर तगडे आव्हान राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दाेन दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने इच्छुकांची तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे, तसेच कागदपत्रे गाेळा करण्यासाठी उमेदवारांची दमछाक हाेत असल्याचे चित्र आहे. शेवटच्या दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी वाढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर लढतीचे चित्र आहे.
या ग्रामपंचायतींकडे लक्ष
बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट (१७ सदस्य), धाड(१७ सदस्य),सागवन(१७ सदस्य), चांडाेळ (१७ सदस्य), डाेंगरखंडाळा(१५सदस्य), काेलवड(१३ सदस्य), मासरुळ (१३ सदस्य), रायपूर (१५ सदस्य) आदी ग्रामपंचायतीकडे विविध पक्षांच्या नेत्याचेच लक्ष लागले आहे. त्यासाठी माेर्चेबांधणी करण्यात येत आहे.
उमेदवारी अर्जासाठी उसळणार गर्दी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळणार असल्याचे चित्र आहे. बुलडाणा तहसील कार्यालयात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत आहे.