बुलडाणा/दुसरबीड : १४व्या वित्त आयाेगाचा निधी मुदत संपल्यानंतरही वापरल्याप्रकरणी दुसरबीड येथील ग्रामविकास अधिकारी आ. धो. फुपाटे यांना १३ जानेवारी राेजी निलंबीत करण्यात आले आहे. सिंदखेड राजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाइ केली आहे.
ग्राम विकास अधिकारी फुपाटे यांनी कार्यरत असताना दुसरबीड बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात स्वतः व त्यांच्या मुलाच्या नावाने तसेच ग्रामपंचायत मध्ये कार्यरत कर्मचाऱ्याच्या नावाने धनादेश काढल्याचे प्रशासकांच्या निदर्शनास आले. तसेच नमुना ८ ला नियमबाह्य नोंदी घेतल्याने गावात वाद-विवाद निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, असे प्रशासक किशोर पवार यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. सोबतच जि.प. सदस्य सिंधुताई खंदारे व पं. स.सभापती नंदिनी देशमुख यांनी मुकाअ जि प बुलडाणा यांच्याकडे पाठपुरावा केला. दरम्यान, चाैकशीमध्ये दाेषी आढळल्याने गटविकास अधिकारी पं. स. सिंदखेड राजा यांनी ग्रामविकास अधिकारी फुफाटे यांना निलंबीत केले आहे.
जि.प.सदस्यांनी केली हाेती मागणी
जिल्हा परिषद सदस्य सिंधुताई पंडितराव खंदारे व पंचायत समिती सभापती नंदिनी विलासराव देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांना १७ डिसेंबर २०२० रोजी एका पत्राद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत पत्र दिले होते.