लोणार येथे तहसील कार्यालयाजवळच शासकीय स्वस्त धान्याचे गोदाम आहे. या गोदामातून धूर येत असल्याचे काहींनी पाहले. त्याची त्वरित तहसीलदार सैफन नदाफ यांना माहिती देण्यात आली. त्यांनी व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक हेमंत पाटील यांनी लगोलग गोदामाकडे धाव घेतली. पालिकेच्या अग्निशामक दलासही याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे मार्च महिन्याचे वाटपाच्या आलेल्या धान्यामुळे लोणार येथील हे शासकीय गोडावून जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले होते.
आगीचे स्वरूप छोटे असल्याने ही आग नेमकी कशी व कुठे लागली हे आधी समजले नाही. मात्र, धूर दिसल्यानंतर धान्याची पोती तेथून लगेच खाली करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच अग्निशामक दलाच्या पथकाने गोदामातील एका पोत्याला लागलेली आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा गोदामातील लाखो रुपयांच्या धान्याची नासडी झाली असती.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक आबेद खान, डॉ. अनिल मापारी, शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळिराम मापारी, शिवसेनेचे शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, माजी नगरसेवक साहेबराव पाटोळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.