अर्जूनकुमार आंधळे देऊळगावराजा, दि. २३- देऊळगावराजा तालुक्यातील ५९ गावांत यावर्षी शेतकर्यांनी मोठय़ा अपेक्षेने तुरीच्या पिकांची लागवड केली. उत्पादनही चांगले निघाले. नाफेडकडून तूर खरेदीला सुरुवात झाली; मात्र नियोजनाचा अभाव आणि बारदानाच उपलब्ध नसल्याकारणाने सगळेच नाफेड केंद्रावरील तूर खरेदी ठप्प झाली आहे.जवळपास एक महिन्यापासून वाहनांच्या रांगा नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर लागल्या असून, मापच होत नाही. परिणामी, शेकडो वाहने उभीच आहेत. तूर खरेदी केंद्रावर हमाल आणि काट्यांची आवश्यकतेनुसार उपलब्धता नाही. त्याच बरोबर बारदाना नसल्याने तूर खरेदीचा काटाच बंद असल्याचे चित्र देऊळगावराजा येथे गुरुवारी दिसून आले. बाजार समितीच्या माहितीनुसार आतापर्यंत ६६ क्विंटल तुरीची खरेदी झाल्याचे सांगितले. हरभरा २५ क्विंटल, गहू ३५ क्विंटल इतकी आवक आली आहे. हमाल व काट्यांच्या तसेच बारदाण्याच्याअभावी तुरीची खरेदी बंद असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. प्रत्येक शेतकर्याजवळ वाहने नसल्याने तूर विक्रीसाठी आणताना मोठा त्रास होत आहे. जी वाहने ट्रॅक्टर, मेटॅडोर यातून नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर आणल्या गेली. ती वाहने एक महिन्यापासून रांगेत उभी असल्याने तोही आर्थिक भुर्दंड शेतकर्यांना सोसावा लागत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. नाफेडने तूर खरेदी सुरु करण्यापूर्वीच येणार्या अडचणींचे नियोजन करणे आवश्यक होते; मात्र तसे न झाल्याने याचा फटका शेतकर्यांना बसला आहे. तुरीची खरेदी सुरु होईल, या आशेवर शेतकरी आहेत. नेमकी खरेदी पुन्हा कधी सुरु होणार, याबद्दल मोठी शंका निर्माण झाली आहे. जेवढी गरज आहे, तेवढे मुबलक हमाल व काटे कधी उपलब्ध होणार बारदाना कधी येणार, हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.
तालुक्यात यावर्षी तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. अजून बरेच शेतकर्यांची तूर विक्रीसाठी येणे बाकी आहे. नाफेडने बारदाना व आवश्यक साहित्य उपलब्ध करुन खरेदीला सुरुवात करावी. जोपर्यंंत सर्व शेतकर्यांचा पूर्ण माल विक्रीसाठी येत नाही तोपर्यंत नाफेडने खरेदी सुरु ठेवावी.-भगवान मुंड, संचालक बाजार समिती, दे.राजा.एक महिन्यापासून ट्रॅक्टर रांगेत उभा आहे. कधी हमाल नाही, काटे कमी आहेत. बारदाना संपला हे उत्तरे ऐकून शेतकरी आता थकलेत आता तर तुरीची खरेदी पण बंद झाली. - सचिन काकडपिंपळगाव बु., शेतकरी