मोताळा ( बुलडाणा) : मोताळा नांदुरा मार्गावरील आडविहीर फाट्यानजीकच्या वळणावर गुरूवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत येथील वन परिक्षेत्र विभागात कार्यरत असलेल्या २९ वर्षीय वनपालचा दुचाकी अपघातामध्ये घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ११:३0 वाजता उघडकीस आली. वनपाल गणेश दिनकर चौधरी नांदुरा असे अपघातात ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. वनपाल गणेश चौधरी हे गुरूवारी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीने घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने आडविहीर फाट्याजवळ कट मारला. त्यामुळे गणेश चौधरी यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या निंबाच्या झाडावर आदळले. या अपघातात गणेश चौधरी जागीच ठार झाले. याप्रकरणी राजू बर्दे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौधरी हे मोताळा येथे वनपाल होते.
अज्ञात वाहनाच्या धडकेत वनपाल चौधरी ठार
By admin | Updated: November 7, 2014 23:22 IST