लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाचा वेगही वाढला होता. परंतू गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. ११ एप्रिल रोजी सकाळपर्यंत केवळ ९ हजार डोस जिल्ह्यात उपलब्ध होते. लसीअभावी अनेक केंद्र बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लस न देताच परत पाठवले जात आहे. जिल्ह्यात लसीचे संकट असतानाही बंद केंद्राची संख्या आरोग्य विभागाकडून गुलदस्त्यात ठेवण्यात येत आहे.ज्याठिकाणी लसीकरण सुरू आहे, त्याठिकाणच्या केंद्रातही मोठी गर्दी होत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढली आहे. परंतू लसीचा तुटवडा निर्माण झालेल्याने जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रावरील लस देण्याची मोहीम ठप्प झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय याठिकाणचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील किती केंद्र बंद झाले याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. परंतू अगदी बोटारव मोजण्याइतक्याच ठिकाणी लसीकरण सुरू आहे. रविवारी सकाळी नऊ हजार डोस उपलब्ध होते. त्यामुळे सोमवारपर्यंत साधारणत: लसीकरण सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात लसीचा तुटवडा, बंद केंद्राची संख्या गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 10:58 IST