बुलडाणा : जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे लसीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे, तरी टप्प्याटप्प्यानुसार नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सहा केंद्रांवर लसीकरण सुरू हाेणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
लसीकरणाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा, सामान्य रुग्णालय, खामगाव, ग्रामीण रुग्णालय, दे राजा, उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर, शेगांव व चिखली या सहा ठिकाणी लसीकरणाला सुरुवात होणार आहे.
लस ही उजव्या दंडाच्या वरील बाजूस देण्यात येणार आहे. लसीचे इंजेक्शन हे ऑटो डिजीबल आहे. त्यामुळे एका इंजेक्शनने एकाच व्यक्तिला लस दिली जाईल. पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस २८ दिवसांनंतर देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोससाठीही लाभार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहे. दुसऱ्या डोसनंतर १५ दिवसांनी कोविड आजाराशी लढण्यासाठी प्रति पिंड शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर व हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे या त्रिसुत्रींचा अवलंब करावा लागणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ६४६ आरोग्य संस्थांमध्ये १३ हजार ९६० डॉक्टर, आरोग्यसेविका व आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या फेरीमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास त्वरित रुग्णवाहिकेद्वारे संबंधित शासकीय किंवा खासगी रुग्णालयात उपचाराची सुविधा असणार आहे.
अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार
लसीकरणादरम्यान कुणीही सोशल मीडियावर अफवा पसरविल्या, खोट्या बातम्या दिल्या किंवा लसीची नकारात्मकता असणाऱ्या पोस्ट जाणूनबुजून व्हायरल केल्या तर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड लसीकरणादरम्यान कुणीही सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड करू नये किंवा पसरवू नये. लसीकरण हे राष्ट्रीय कार्य आहे, या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.