लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधामुळे एसटीची चाकेही थांबली होती. ७ जूनपासून निर्बंधामध्ये शिथीलता आल्याने आता लालपरीही पूर्ण क्षमतेने धावणार आहे. सोमवारपासून जिल्ह्यातील सात आगारामधून लांब पल्ल्याच्या ४६ बसेसलाही आता ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या बुलडाणा विभागातून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस दिवसाला जवळपास २६ हजार कि.मी. अंतर कापणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गामूळे लॉकडाऊन करण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. केवळ जिल्हांतर्गत बसेसच सुरू होत्या. त्यातही २२ प्रवाशी आल्यानंतरच बसे पुढे जात होती. त्यामुळे प्रवाशांनीही बसकडे पाठ फिरवल्याने एसटी महामंडळाला मोठा तोटा सहन करावा लागला. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जिल्ह्यात बरेच निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामध्ये एसटी बसही आता पूर्ण क्षमतेने सोडण्यात येणार आहेत. ७ जून पासून लालपरी पुन्हा जोमाने धावणार आहे. जिल्ह्यातून जवळपास सर्वच मार्गावरून बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक आगारामधून लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
उभे राहून प्रवास करण्यास मनाईराज्य परिवहन महामंडळच्या बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेसह सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र उभे राहून प्रवास करण्यास तिसऱ्या स्तरातील अनलॉक झालेल्या जिल्ह्यात मनाई आहे. आंतरजिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवाशी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे, त्यामुळे एसटी महामंडळाच्या चालक वाहकांना दिलासा मिळाला आहे.
एका आगाराला दोन ते तीन कोटींचा तोटाआतापर्यंत बसेस बंद असल्याने एका आगाराला जवळपास दोन ते तीन कोटींचा तोटा सहन करावा लागला. कोरोनामुळे दीड महिन्यापासून एसटी महामंडळाच्या बसेस बंद झाल्या होत्या. एकट्या बुलडाणा आगाराला जवळपास चार कोटी रुपयांचा तोटा गेल्या दीड महिन्यात झाला होता.