शेगाव : मूळ नोंदणीकृत भाडेपट्यामध्ये फेरफार करून जमिनीचे क्षेत्रफळ वाढवून, सदर बनावट कागदपत्रे सादर करून बी.एड. कॉलेजला विद्यापीठाकडून संलग्नता आणि एनसीटीई भोपालकडून मान्यता मिळवल्याप्रकरणी आणि सरकारी जमिनीचा भाडेपट्टा तयार केल्याप्रकरणी दाखल जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह या प्रकरणाशी संबंधित सर्वांना नोटीस दिल्या आहेत. २00८ मध्ये शेगाव येथील अजाबराव उत्तमराव देशमुख यांनी शिट नं.११३ बी प्लॉट नं.४0 क्षेत्रफळ ११३ चौ.मी. ह्या सरकारी मालकीच्या जागेचा दि.२९ मे २00८ रोजी अधिकार नसताना त्यांचा मुलगा दिलीप अजाबराव देशमुख अध्यक्ष असलेल्या गोदाई शिक्षण प्रसारक व सांस्कृतिक क्रिडा मंडल शेगाव या संस्थेच्या नावे करून दिला. मूळ १२ पानांचा हा दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालय शेगाव येथे १९८१-0८ या क्रमांकावर नोंदला आहे; परंतु सदर गोदाई शिक्षण संस्थेने मूळ १२ पानांचा भाडेपट्टा फेरफार करून २४ पानांचा तयार करून संस्थेकडे जमिनीचे क्षेत्रफळ वाढवून दाखविले त्याव्दारे नवीन लावलेल्या पानांवर दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट शिक्के मारून सदर बनावट भाडेपट्टा असलेला प्रस्ताव एनसीटीई भोपाळ यांचेकडे सादर करून स्व. उत्तमराव देशमुख बी.एड.कॉलेजला मान्यता मिळविली आणि त्याच आधारावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्याकडून संलग्नता मिळवली. महाविद्यालयाशी संबंधित संस्था ही एनसीटीई आणि विद्यापीठ कायद्याने ठरवून दिलेली मानके पूर्ण करीत नसून संस्थेने वरील संस्थांची फसवणूक केली आहे त्याची मान्यता रद्द व्हावी तसेच सरकारी जागेचा बेकायदेशीर भाडेपट्टा रद्द करण्याबाबत शेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार प्रकाश उर्फ मंगेश ढोले यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती.
बनावट कागदपत्रे नेऊन मिळविली विद्यापीठाची मान्यता
By admin | Updated: May 5, 2015 00:09 IST