लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यात दोन विविध घटनांत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सिंदखेडराजा : येथील आठवडी बाजाराजवळील मोठ्या बारवमध्ये २३ मे रोजी सकाळी ११ वाजता संतोष इश्वर संत्रे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. संतोषने चपला बारवच्या दगडी पायऱ्यावर ठेवून कपड्यानिशी पाण्यात उडी मारली असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी खेळणाऱ्या मुलांनी सांगितले; मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला की, आत्महत्या केली, याची चर्चा शहरामध्ये होती.बांधकाम मिस्त्री संतोष ईश्वर संत्रे (३२) हे २३ मे रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान आठवडी बाजाराजवळील बारवच्या पायऱ्यावर बसताना प्रत्यक्षदर्शिंंनी पाहिले. त्यांनी पाण्यात उडी मारली; परंतु त्यानंतर ते पाण्यात बुडाले. ही माहिती ठाणेदार संतोष नेमनार यांना समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते बुद्दू चौधरी, राम आढावसह अनेकांनी पाण्यात उड्या मारुन शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र मृतदेह आढळला नसल्यामुळे नेमणार यांनी जालना-औरंगाबाद, बुलडाणा व अकोला येथील आपत्कालीन चमूला माहिती दिली. जालना येथील आपत्कालीन टीमचे फायरमन सुरज काळे, आर.बी.सोनार, उत्तम राठोड, शे.रशिद, नगर परिषद जालना यांच्या परिश्रमामुळे सुरज काळे यांना दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक पोलीस स्टेशनचे राजू घोलप, विठ्ठल मडावी, रमेश गोरे, प्रदीप वाघ, संतोष धंदर या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. संग्रामपूर : तालुक्यातील निवाणा येथील एका ३० वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. गोपाल बळीराम उमरकर (वय ३०) असे मृत इसमाचे नाव असून, मृताचे भाऊ सागर बळीराम उमरकर यांनी तामगाव पोलिसात २३ मे रोजी फिर्याद दिली असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी १३/१७ नुसार मर्ग दाखल केला आहे.
पाण्यात बुडून दोन तरूणांचा मृत्यू
By admin | Updated: May 24, 2017 01:05 IST