धाड (बुलडाणा): सततच्या अस्मानी संकटाने होरपळलेल्या, शे तकर्यांना, सुलतानी संकटाने हवालदिल केले असून शेतकर्यांना दिलासा मिळण्याऐवजी ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्याचा प्रत्यय बुलडाणा तालुक्यात येत असून कृषी विभागातर्फे वाटप होणार्या सुक्ष्म सिंचन योजनेचे २ कोटी ८४ लाख ६९ हजाराचे अनुदान सन २0१२ पासून रखडले आहे. सदरचे अनुदान अद्यापपर्यंंंत शेतकर्यांना मिळाले नसल्याने बुलडाणा तालुक्यातील १ हजार ९२८ शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.शासनाचे काम बारा महिने थांब ही ग्रामीण भागातील म्हण सार्थ ठरवत, उलट गेल्या २४ महिन्यापासून शेतकर्यांचे शासकीय अनुदान लालफीतशाहीत अडकून पडले आहे. सततच्या दुष्काळाने शेतकरी हैराण आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल जात आहे. आगामी काळात सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार म्हणून पाण्याची बचत होऊन कृषी उत्पन्न हाती येण्यासाठी शासनाने विदर्भ सधन सिंचन योजना सुरू केली, त्याअंतर्गत ठिबक संच व तुषार संच खरेदीवर शेतकर्यांना क्षेत्राप्रमाणे ५0 टक्के ते ७५ टक्के अनुदानाची सोय करुन दिली.गेल्या २0१२ पासून बुलडाणा तालुक्यातील शेतकर्यांनी आजवर १५८0 हेक्टरवर, ठिबक आणि तुषार सिंचन संच बसवून घेतले व त्याकरिता आवश्यक असणारी सर्व रक्कम शेतकर्यांनी कर्जाऊ घेऊन भरणा केली. मुळात तात्काळ स्वरुपात शेतकर्यांना त्यांचे अनुदान थेट त्यांचे बँक खात्यात जमा होणे आवश्यक असताना केवळ शासनाच्या दप्तर दिरंगाईने अजुनही शेतकर्यांना त्यांचे अनुदान प्राप्त झालेले नाही.बुलडाणा तालुक्यात ठिबक संचाचे एकूण २५१ शेतकर्यांचे अनुदान प्रस्ताव तर तुषार संचाचे एकूण १६७७ शेतकर्यांचे अनुदान प्रस्ताव २0१२ पासून कृषी विभाग बुलडाणा यांचेकडे प्रलंबित आहेत.कृषी अधिकारी कार्यालयातर्फे वरीष्ठ पातळीवर अनुदानाची मागणी केली आहे. मात्र अजुनही निधी प्राप्त नाही. निधी आल्यास शेतकर्यांना अनुदान वाटप होणार असल्याची माहीती कृषी अधिकारी बी.टी. हिवाळे यांनी दिली.
सुक्ष्म सिंचन अनुदानापासून दोन हजार शेतकरी वंचित
By admin | Updated: November 23, 2014 00:01 IST