लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गेल्या महिनाभरात इंग्लंडहून जिल्ह्यात नऊ जण परतले आहेत. त्यापैकी सात जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून, खामगावतील दोघांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे या चाचण्या तपासणीसाठी आता पुणे येथील एनआयव्ही ( राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा) येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबर रोजी खामगावात परतलेल्या व्यक्तींच्या निकट संपर्कातील सर्वांचे ट्रेसिंग आरोग्य विभागाचे पथक करत असून, संबंधितांचे स्वॅब घेतले आहेत. हे सर्व स्वॅब बुलडाणा येथील प्रयोगशाळेसह पुण्यातील एनआयव्ही कडेही पाठविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. रविवारी सकाळीच एक पथक बुलडाण्याहून खामगाव येथे गेले होते. पथकाने अत्यंत बारकाईने हे कॉन्टक्ट ट्रसिंग केल्याची माहिती आहे. हे प्रकरण आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतले असून, खामगावमधील संबंधित परिसर सील करून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एप्रिलपासून विदेशातून एकूण कितीजण आले २३३ एप्रिल महिन्यापासून बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत २३३ प्रवासी विदेशातून आलेले आहेत. किर्गीस्तानची राजधानी बिश्केक येथून आलेले सहा प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले होते. ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत २२२ फ्लाइटमधून जिल्ह्यात १०५ नागरिक परदेशातून परतले होते. आता नव्याने माहिती घेण्यात येत आहे.
विदेशातून येणाऱ्यांची तपासणी कशी होते?विदेशातून येणाऱ्यांची मुंबई विमानतळावरच तपासणी करण्यात येते. इंग्लंडमधील विषाणूसंदर्भात गेल्या आठवड्यात अलर्ट मिळाला होता. त्यापूर्वी आलेल्यांची तपासणी झाली नव्हती. त्याउपरही जिल्ह्यात आलेल्या विदेशी नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येऊन संस्थात्मक विलगीकरणात व नंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येते.