बुलडाणा : येथून जवळच असलेल्या करवंड परिसरात बकर्या चारण्यासाठी गेलेल्या दोन जणांवर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने ते दोघेही जखमी झाले. ही घटना ८ मे रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. करवंड येथील रहिवाशी श्याम उत्तम जाधव (३८) व माणिक बबन कोल्हे (१८) हे दोघे गावातील बकर्या चारण्याचा व्यवसाय करतात. आज सकाळी ८ मे रोजी नित्यनियमाप्रमाणे दोघेही गावातील बकर्या घेऊन चारण्यासाठी जवळच्या डोंगरात गेले. यावेळी पाण्याच्या शोधात असलेल्या अस्वलाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात श्याम जाधव, माणिक कोल्हे हे दोघेही जखमी झाले. ओरडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या शेतातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. शेतातील नागरिक येईपर्यंत अस्वलाने तेथून पळ काढला. या हल्ल्यात जखमी श्याम जाधव व माणिक कोल्हे यांना जखमी अवस्थेत येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यामधील जखमी श्याम जाधव यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे करवंड परिसरात एकच खळबळ उडाली होती.
अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण जखमी
By admin | Updated: May 9, 2016 02:14 IST