खामगावात दोन बोगस डॉक्टर ताब्यात, हॉटेलात करीत होते उपचार
By अनिल गवई | Published: April 3, 2023 01:52 PM2023-04-03T13:52:10+5:302023-04-03T13:53:01+5:30
खामगाव शहरातील विकमशी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार सुरू होते.
खामगाव: शहरातील एका हॉटेलात रूग्णांवर उपचार करणार्या दोन डॉक्टरांना शहर पोलिसांनी सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. याकारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरातील विकमशी चौकातील एका लॉजच्या खाली असलेल्या हॉटेलात डॉक्टरांकडून रूग्णांवर उपचार सुरू होते. वात आणि असाध्य रोगाच्या उपचारासाठी जमलेल्या रूग्णांवर उपचार सुरू असताना सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी शहर पोलीस स्टेशन गाठले. पोलीसांच्या मदतीने उपचार सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने दोन डॉक्टरांसह येथून डॉक्टरांनी मोठ्याप्रमाणात औषधसाठा जप्त केला.
दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस सुत्रानुसार महावीर सिंह आणि अरविंद कुमार अशी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. शहर पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पंकज सपकाळे आणि शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, शहरातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील रूग्ण अधिक
वातविकार आणि इतर असाध्य आजारावर उपचारासाठी हे डॉक्टर येथे महिन्यातून दोन वेळा येत होते. दरम्यान, सोमवारी तक्रारीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी शहरासोबतच ग्रामीण भागातील रूग्ण येथे मोठ्याप्रमाणात उपचारासाठी येत होते.
नावांमध्ये तफावत
याठिकाणी डॉक्टरांकडून वाटण्यात आलेल्या पत्रकामध्ये वेगळी आणि प्रत्यक्षातील डॉक्टर वेगळे असे विरोधाभासी चित्र पोलीस कारवाईत समोर आले. त्यामुळे पोलीस उपलब्ध दस्तवेजानुसार आरोपींच्या नावाची खात्री करीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.