बुलडाणा : हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने शासकीय तूर खरेदी करण्यात येणार आहे. तुरीला सहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव असून, या भावाला तुरीची खरेदी होणार आहे. तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे. तूर खरेदीसाठी जिल्ह्यात नऊ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
त्यामध्ये बुलडाणा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, दे. राजा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, लोणार तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, मेहकर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, शेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, संग्रामपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री समिती मर्यादित, संत गजानन कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र, साखरखेर्डा, ता. सिं. राजा आणि माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी दे.राजाचे केंद्र, सिं. राजा यांचा समावेश आहे. या खरेदी केंद्रांवर तुरीची खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित खरेदी केंद्रांवर जाऊन तूर खरेदीकरिता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस शिंगणे यांनी केले आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
तूर नोंदणीकरिता शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा ऑनलािन पिकपेरासह दाखला, बँक पासबुकची आधार लिंक केलेली छायांकित प्रत, मोबाइल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.