जिल्ह्यात सापडले सात प्रवासी
बुलडाणा जिल्ह्यात २४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांपैकी सात जणांचा शोध घेण्यात प्रशासनास यश आले आहे. २४ डिसेंबर रोजी झालेल्या व्हीसीमध्येच या संबंधित नागरिकांचे पत्ते व मोबाइल क्रमांक जिल्हा प्रशासनास पुरविण्यात आले होते. त्या अनुषंगाने शेगाव येथील एक, खामगाव येथील दोन, मलकापूर येथील तीन आणि सिंदखेडराजा तालुक्यातील एकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये शेगाव, खामगाव आणि मलकापूर येथील सहा जणांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील एकाची चाचणी २५ डिसेंबर रोजी घेण्यात आली असून, त्याचा अहवालही रात्रीच किंवा २६ डिसेंबर रोजी उपलब्ध होण्याची शक्यता आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. सोबतच या व्यक्तीच्या संपर्कातील चार कुुटुंबीयांची चाचणी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मलकापूर येथील तिघांचा क्वाॅरंटाइन कालावधी कधीचाच संपला आहे. त्यातील एक जण हा वाशिम जिल्ह्यातील आहे. सि. राजा तालुक्यातील एक व्यक्ती हा १२ डिसेंबर रोजी गावी पोहोचला आहे. ९ डिसेंबर रोजी इंग्लंडमध्ये त्याची चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. आता त्याच्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.
तर पुण्याला पाठवावा लागतील नमुने
बुलडाणा जिल्ह्यात इंग्लंडमधून आलेल्यांपैकी सहा जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आहेत. एकाची चाचणीचा अहवाल अद्याप बाकी आहे. तो जर पॉझिटिव्ह आला तर त्याचे नमुने पुन्हा पुणे येतील एनआयव्ही प्रयोगशाळेस जेनेटीक कोडिंगसाठी पाठवावे लागणार आहे. जेणे या कोरोनाचा आरएनए हा भारतीय आहे की इंग्लंडचा,हे हे समजणे शक्य होईल; परंतु जर संबंधिताचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्याची गरज पडणार नाही.