नांदुरा (बुलडाणा) : तालुक्यातील अलमपूर गावाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे ४ ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्मचार्यांना नांदुरा तहसील गाठता आले नाही. त्यामुळे या चमुला रात्रभर मतदान केंद्रातच मुक्काम करावा लागला. मंगळवारच्या पहाटेपासून सर्वत्र संततधार पाऊस सुरू झाल्याने परिसरातील नदी- नाले दुथडी वाहून पूर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सोबतच पुरामुळे वाहतूक खोळंबल्याने याचा फटका मतदान केंद्रावर असलेल्या चमूला सुध्दा बसला. ४ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. मतदानानंतर या चमूला निवडणूक साहित्य नांदुरा येथील तहसील कार्यालयात पोहोचवावे लागणार होते; मात्र अलमपूर नजीकच्या नाल्याला पूर आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. तसेच नांदुर्याकडे येणार्या दुसरा पर्यायी रस्ता सुध्दा उपलब्ध नव्हता. त्यामुळे मतदान केंद्रावरील चमुंना मतदान केंद्रातच मुक्काम करावा लागला. अखेर ५ ऑगस्टच्या पहाटे ट्रॅक्टरच्या मदतीने मतदानाचे साहित्य व कर्मचारी यांना नाल्याच्या पुरातून सुखरुप पैलतिरावर पोहचविण्यात आले. अलमपूर ग्रामपंचायतच्या तीन वॉर्डासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन सील करेपर्यंत नाल्याला पूर आल्याने कर्मचारी रात्रभर अडकून पडले होते.
ट्रॅक्टरने पोहोचविले सीलबंद मतदानयंत्र!
By admin | Updated: August 6, 2015 00:33 IST