बुलडाणा: दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकर्याला अवकाळी पावसाने रब्बीचेही उत्पन्न मिळू दिले नाही. २७ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान जिल्हय़ातील सात तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने तब्बल ३ हजार हेक्टरचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. जिल्हय़ातील बुलडाणा, चिखली, मोताळा, मेहकर, लोणार व देऊळगाव राजा या घाटावरील तालुक्यांसोबतच मोताळा, खामगाव या दोन तालुक्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कांदा, गहू, हरभरा, मका, केळी, संत्रा, डाळिंब, भाजीपाला व इतर पिके या अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून, सर्वाधिक नुकसान चिखली तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल मेहकर व मोताळा तालुक्याला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी कृषी विभागासह महसूल विभाग कामाला लागला असून, कोरडवाहू क्षेत्रावर ६ हजार तर बागायती आणि फळ पिकासाठी १३५00 रुपये एवढी मदत मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. चिखली तालुक्यात कांदा बीजचे उत्पादन सर्वात जास्त घेतल्या जाते. या तालुक्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला असून, त्यामध्ये कांदा बीज उत्पादक शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. लोणार तालुक्यातील गंधारी, सावरगाव मुढे, रायगाव, धाड, अजीसपूर, चिंचोली सांगळे, या गावांना अवकाळी पावसासह, वादळी वारा आणि गारपिटीने झोडपून काढले. लिंबाएवढय़ा पडलेल्या गारीने झाडावर एकही पान शिल्लक ठेवले नाही. दरम्यान, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत राजकीय पक्षांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण करून तातडीने मदत देण्याची कसरत प्रशानाला करावी लागणार आहे.
तीन हजार हेक्टरला अवकाळी फटका
By admin | Updated: March 4, 2016 02:29 IST