धाड (जि. बुलडाणा) : डॉ. हिम्मत बावस्कर यांच्या शेतावर सालगडी म्हणून काम करणार्या गुलाब तायडे यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना २७ नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. हे तीनही आरोपी धाड येथील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार, धाड शिवारात धामणगाव रोडवर डॉ.हिम्मत बावस्कर यांचे शेत असून, येथे भडगाव येथील गुलाब तायडे मागील दहा वर्षांपासून सालगडी म्हणून कामावर होते. त्यांचा मृतदेह कमरेला दगड बांधलेल्या स्थितीत शेततळ्यात आढळला होता. प्रथमदर्शनी पोलिसांनी र्मग दाखल करुन तपास सुरू केला होता. याप्रकरणी मृतक गुलाब तायडे यांची सून ज्योती गजानन तायडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत खुनाचा संशय व्यक्त केला होता. यावरुन धाड पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्या दिशेनी तपास सुरू केला. गेल्या दीड महिन्यात सतत खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवत अनेकांना चौकशीत घेतले; मात्र पाहिजे तसे यश त्यांना मिळाले नव्हते. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख यांनी तपास यंत्रणा कसून कामास लावली व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत संशयीतांच्या मोबाइलचा डाटा तपासत त्यांनी धाड येथील आरोपी शे.हुसेन शे.करीम ऊर्फ बब्बू बागवान (वय ५१ वर्ष), मोसीन खान कय्युम खान (वय २७), अझहर खान भिकन खान (वय २७) रा.धाड यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. वरील आरोपींची कसून चौकशी करत त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. मृतक हा आपला शेताचा शेजारी असून, त्याने वेळोवेळी आपणांस पाण्याचे पाइप व बैलजोडी कामास दिली नाही म्हणून आपण त्यास ठार केल्याचे कबूल तीनही आरोपींनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३0२, २0१, ३४ भादंविचा गुन्हा नोंद केला आहे. या खूनप्रकरणी पोलीस अधीक्षक संजीव बावीस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर यांनी धाड येथे भेट दिली. त्यांचे मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी समीर शेख, ठाणेदार लक्ष्मण सोद्मो, पीएसआय अरुण किरडे, गजानन मुंढे यांच्यासह पोलीस कर्मचारी राजेश गोंड, माधवराव कुटे, ऋषिकेश पालवे, प्रवीण इंगळे, गजानन मोरे, प्रकाश दराडे, एएसआय प्रताप भुते तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे गजानन आहेर, अमोल तरमळे व योगेश सरोदे आदींनी काम पाहिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या खून प्रकरणातील बरेच गूढ बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
खूनप्रकरणी तीन आरोपी जेरबंद
By admin | Updated: November 28, 2015 02:36 IST