कोयाळी दहातोंडे (बुलडाणा) : लोणार तालुक्यातील उद्नापूर येथे गत १५ दिवसांपासून मलेरियाने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.सुलतानपूर आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या उद्नापूर येथे १५ दिवसांपासून मलेरियाची साथ आहे. लहान मुलांसह वृद्धही मलेरियाचे शिकार बनले आहेत. याकडे मात्र आरोग्य विभाग फिरकूनही पाहत नाही. आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक हे पद गत एक ते दीड वर्षापासून रिक्त आहे. त्यामुळे वडगाव तेजन या उपकेंद्रातील उद्नापूर, कोयाळी दहातोंडे, वडगाव तेजन, पारडी या गावात शासकीय आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे येथील रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. उद्नापूर येथे सद्य:स्थितीत सुमारे ५0 रुग्ण मलेरियाने त्रस्त आहेत. यासंदर्भात आरोग्य विभागाला सूचना देऊनही उद्नापूर गावाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन धूर फवारणी तसेच मोफत औषध वाटप करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
मलेरियाचे थैमान
By admin | Updated: September 28, 2014 23:38 IST