मलकापूर (जि. बुलडाणा): शिक्षण संस्थाचालकांच्या त्रासाला कंटाळून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर शाळेच्या आवारातच शिक्षकाने अंगावर रॉकेल घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना काल २६ रोजी तालुक्यातील निपाणा येथे सकाळी ८.५0 वाजता घडली. तालुक्यातील पिंपळखुटा (महादेव) येथील विक्रमसिंग सरदारसिंग मोरे हे गेल्या ६ ते ७ वर्षांपासून निपाणा येथील कर्मवीर भिकमसिंह पाटील माध्यमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. याच जागेसाठी संस्थेने एका वृत्तपत्रात जाहिरात देऊन ही जागा नव्याने भरण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळे याबाबत विक्रमसिंग मोरे यांनी संस्था उपाध्यक्ष दशरथ पांडे यांच्याशी संपर्क साधला असता, तुमचे शाळेवरचे काम संपले, तुमचा काही रोल नाही, असे सांगून आर्थिक व शारीरिक त्रास देण्यात आल्याचा आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न शिक्षक विक्रमसिंह मोरे या शिक्षकाने केला. याप्रकरणी शिक्षक विक्रमसिंह मोरे यांच्याविरुद्ध कलम ३0९ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. शाळेचे अध्यक्ष राम राठोड यांनी मात्र सर्व आरोप निराधार असल्याचे सांगीतले. त्यांनी शाळा हस्तांतरीत करून घेतली असल्याचे सांगत अधिकृतपणे मिळालेले सर्व कर्मचारी कार्यरत आहे. या घटनेतील शिक्षकाचे नाव त्या यादीमध्ये नाही त्यामुळे त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Updated: January 28, 2015 00:11 IST