संदीप गावंडे - नांदुरा‘गाव करी ते राव न करी’ अशी जुनी म्हण आहे. अगदी असाच प्रत्यय वडनेर भोलजी येथे आला असून पाणी साठवून भुजलसाठ्यात वाढ करण्यासाठी शासनाकडे वारंवार मागणी करून अपेक्षित कामे होत नसल्याने शेवटी येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने २० वर्षापासून साचलेल्या नाला बांधातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी साठणार असून त्याचा फायदा भुजल पातळीत वाढ होण्यास होणार आहे.दिवसेंदिवस कमी होत चाललेले पावसाचे प्रमाण ही शेती व शेतकरी यांच्यादृष्टीने अतिशय चिंताजनक बाब असून यावर उपाय म्हणजे पावसाचे पडणारे जास्तीत जास्त पाणी हे जमिनीत जिरवल्या गेले पाहिजे त्यामुळे भुजल पातळीत होणारी घट काही प्रमाणात थांबु शकते. शासनस्तरावर सध्या जलयुक्त विार योजनेच्या माध्यमातून शेततळे, नालाबांध, नाला खोलीकरण, सिमेंट बांध इ. विविध उपक्रम राबविल्या जात असले तरी गेल्या वर्षभरात यामुळे कितपत फायदा झाला हा चिंतनाचा भाग आहे.वडनेर गाव सुध्दा जलयुक्त शिवार योजनेत असून येथे शेतकरी वर्गाच्या अपेक्षेप्रमाणे अद्यापही कामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेत येथील चमेली नाल्यावरील २० वर्ष जुन्या नाला बांधात साचलेला गाळ काढण्याचे काम हाती घेतले असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा होणार आहे. याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरींना होणार आहे.प्रगतीशील शेतकरी रविंद्र एंडोले, शंकर हिंगे, शे.बिलाल शे.युसुफ यांनी या कामी पुढाकार घेतला असून सोमवारी जलमित्र सुनिल सातव यांचे हस्ते नारळ फोडून या कामाची सुरूवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी हाती घेतलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर ठिकाणचा गाळ काढण्याविषयी कृषी विभागाकडे वेळोवेळी मागणी करूनही काम होत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनीच हे काम हाती घेतले. जलयुक्त शिवार योजनेतील गावाबाबतच अशी दप्तर दिरंगाई असेल तर इतर गावांचा विचारच करायला नको.- सुनिल सातव, जलमित्र, वडनेर भोलजी
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने सुरु केले गाळ काढण्याचे काम
By admin | Updated: April 19, 2017 01:01 IST