बुलडाणा : एकाची जमीन परस्पर दुसर्याच्या नावावर करून कागदपत्रांमध्ये फेरफार करणार्या मालगणी येथील तलाठी अर्चना बाहेकर यांना उपविभागीय अधिकारी यांनी २ मार्च रोजी निलंबित केले. मालगणी येथील रहिवासी तेजराव नामदेवराव चिंचोले यांच्या मालकीच्या जमिनीच्या कागदपत्रामध्ये मंडळ अधिकारी पी.पी. वानखेडे आणि तलाठी अर्चना बाहेकर यांनी फेरफार करून सदर जमीन परस्पर दुसर्याच्या नावावर करून दिली. याप्रकरणी चिंचोले यांनी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. अप्पर जिल्हधिकारी यांनी सदर प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते. नायब तहसीलदार यांनी पिंप्रीकर यांनी प्रकरणाची चौकशी करून तलाठी बाहेकर आणि मंडळ अधिकारी वानखेडे यांनी शासकीय कामात गंभीर स्वरूपाचा हलगर्जीपणा व अनियमितता केल्याबाबातचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला. तलाठी अर्चना बाहेकर यांनी फेरफार क्र.८७१ घेतला असता दिनांकाच्या वर्षामध्ये खोडातोड केली. फेरफार खाते क्रमांक लिहिलेला नाही, तर यामध्ये अतिरिक्त दोन नावांचा परस्पर समावेश केला. विशेष म्हणजे तलाठी बाहेकर यांनी सदर फेरफार सुटीच्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी केल्याचे अहवालात म्हटले आहे. या व अशा अनेक गंभीर स्वरूपची अनियमियतता केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तलाठी अर्चना बाहेकर यांना निलंबित करण्यात आले आहे.
तलाठी निलंबित
By admin | Updated: March 3, 2015 01:30 IST