बुलडाणा, दि. ३१- बीएस-३ प्रकारच्या इंजीन असलेल्या दुचाकीची नोंदणी करण्यास सरकारने १ एप्रिलपासून बंदी केल्यामुळे दुचाकीच्या कंपन्यांनी भरघोस सूट दिली आहे. त्यामुळे बुलडाणा शहर परिसरातील विविध कंपन्यांच्या दुचाकीच्या शोरूममध्ये तुफान गर्दी झाली होती. मात्र, दुपारी स्टॉक संपल्याचे जाहीर करून शोरूम बंद करण्यात आले.बीएस-३ मानक असलेल्या दुचाकी गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यामुळे स्टॉकमध्ये असलेल्या गाड्या खपविण्यासाठी कंपन्यांनी भरघोस सूट दिली. त्यामुळे शहरातील विविध शोरूमवर दुचाकी खरेदीसाठी ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. याबाबत अनेक ग्राहकांनी शोरूमवर दूरध्वनी करून माहिती घेतली. तसेच काहींनी वाहन बुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहन बुक करण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक असल्यामुळे ग्रामीण भागातील असंख्य ग्राहकांनी शहरात धाव घेऊन शोरूम गाठले. त्यामुळे शहरातील विविध भागात असलेल्या दुचाकी शोरूमवर मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. तर काही शोरूमवर दुपारी स्टॉक संपल्याचे जाहीर करून शोरूम बंद करण्यात आले. सर्वात जास्त मोपेड वाहनांना ग्राहक पसंत करीत असल्याचे दिसून आले. मात्र, मोपेड वाहन अनेक ठिकाणी सकाळीच संपल्याचे जाहीर करण्यात आले होते.
दुचाकींवर सूट; ग्राहकांची तुफान गर्दी
By admin | Updated: April 1, 2017 02:07 IST