बुलडाणा : शाळेतून घरी पोहोचण्यास उशीर झाल्याने घरची मंडळी रागावतील, या भीतीने एका शाळकरी विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.शहरातील एडेड विद्यालयात वेदांत शेळके हा इयत्ता पाचवीमध्ये शिकतो. बुधवारी सकाळी ११.३0 वाजता त्याने शाळेला दांडी मारून, मित्रासोबत चिंचा तोडण्यासाठी शाळेच्या बाजुच्याच परिसरात गेला. चिंचा तोडत असताना, एका वृद्ध महिलेने त्याला हटकून, त्याचे दप्तर ताब्यात घेतले. त्या महिलेने दमदाटी करून, दप्तर परत केले; परंतु त्यामुळे शाळेला उशीर झाला. आता शिक्षकांना काय सांगावं, असा प्रश्न त्याला पडला. यातूनच स्वत:च्या अपहरणाचा कट रचण्याची कल्पना त्याने रंगविली. शाळेत गेल्यानंतर शिक्षकाने विचारणा केली असता, त्याने दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी आपले तोंड दाबून उचलून नेण्याचा प्रयत्न केला, असे त्याने सांगितले; परंतु त्यांच्या तावडीतून आपण कशीबशी सुटका करुन घेतली, असेही त्याने सांगितले. शिक्षकांनी लगेचच ही माहिती पोलिस आणि त्याच्या कुटुंबियांना दिली. दिवसाढवळ्या शहरात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने पोलिस प्रशासनामध्ये खळबळ उडाली. तपासासाठी पोलिसांनी तातडीने शाळेत धाव घेतली. त्यांनी मुलाची सखोल चौकशी केली असता, त्याच्या अपहरणाचा प्रयत्नच झाला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही; परंतु या कपोलकल्पित प्रकरणामुळे पोलिस प्रशासनाला काही तास चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
विद्यार्थ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट
By admin | Updated: September 25, 2014 01:18 IST