खामगाव : येथील रेल्वे स्थानकावर ब्लॅकमध्ये तिकिटाची विक्री करणार्या दोघांवर शेगाव रेल्वे पोलिसांनी छापा मारून अटक केल्याची घटना घडली.स्थानिक रेल्वे स्थानकावर अनेक दिवसांपासून ब्लॅकमध्ये कमिशनवर नागरिकांना तिकिटांची विक्री करणार्या दलालांचा मोठय़ा प्रमाणात सुळसुळाट सुरू आहे. दरम्यान, काल शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय आर.एस. बनकर, पोहेकाँ एस.सी. पटारिया, पोकाँ संतोष खेडेकर यांनी सापळा रचून येथील रेल्वे आरक्षण खिडकीजवळ सर्व्हेश ब्रिजमोहन शर्मा (वय २७) रा. नटराज गार्डनजवळ व विजय शंकर तिवारी (वय ५२) या दोघांना रेल्वे आरक्षित तिकिटांची ब्लॅकमध्ये विक्री करताना रंगेहाथ पकडले. यावेळी शर्मा यांच्याकडून भुसावळ ते हजरत निजामुद्दीन रेल्वेचे २ हजार ३६0 रुपयांचे आरक्षित तिकीट जप्त करून दोघांना ताब्यात घेऊन शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले व त्यांच्याविरुद्ध अप.क्र.१२७९/१५ कलम अंडरसेक्शन १४३ रेल्वे अँक्टनुसार गुन्हा दाखल केला. उपरोक्त दोघांना भुसावळ रेल्वे कोर्टात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जमानतीवर सुटका केली. सध्या मोठय़ा प्रमाणावर गर्दी असल्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन अनेक जण ब्लॅकने तिकीट विक्री करतात.
रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री करणा-यांना अटक
By admin | Updated: May 29, 2015 00:11 IST