मनोज पाटील / मलकापूर (जि. बुलडाणा) : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णांची वाढती संख्या व त्या मानाने सेवा देणार्या डॉक्टरांच्या संख्येचा ताळमेळ बसत नाही. रिक्त पदामुळे सर्वसामान्यांमध्ये या रुग्णालयाच्या कार्य प्रणालीवर रोष व्यक्त होत असून या रोषाला येथील सेवा देणार्या डॉक्टरांनाच सामोरे जावे लागते. जवळपास १३ वर्षांपूर्वी येथील सामान्य रूग्णालयाचे भव्यदिव्य वास्तुत रूपांतर झाले. या रूपांतरीत उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ येणार्या रूग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून, येथे ५0 खाटांची व्यवस्था आहे; मात्र दंतरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, फिजीशियन तज्ज्ञ, सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आदींची कमतरता असून, सद्यस्थितीत तीन एमबीबीएस पात्रतेचे तर बीएएमएस पात्रता व आयुष अंतर्गत असलेले ४ वैद्यकीय अधिकारी येथे कार्यरत असून, यापैकी काही मोजके अधिकारीच रूग्णांना वैद्यकीय सेवा देत असल्याचे स्पष्ट दिसते. काही डॉक्टर तर केवळ सकाळी व संध्याकाळी १ ते २ तासच सेवा देतात, अशी ओरडही रूग्णांकडून होताना दिसते. गेल्या एक दशकापासून या रूग्णालयाला स्थायी स्वरूपात वैद्यकीय अधीक्षकच आरोग्य प्रशासनाकडून लाभलेला नाही. या रूग्णालयात सोनोग्राफी मशीनची आवश्यकता असून, मशीन नसल्यामुळे गोरगरीब रूग्ण म्हणजेच गर्भवती महिलांना बाहेरून खासगी रूग्णालयातून ६00 रूपये देऊन सोनोग्राफी करून घ्यावी लागते. स्त्री रोग तज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे येथील एमबीबीएस पात्रतेचे वैद्यकीय अधिकारी डिलेव्हरी पेशंटची कसलीही जोखीम स्वीकारत नाहीत. अशा पेशंटला बुलडाणा अथवा खामगाव रेफरचा सल्ला दिला जातो.
अपु-या सुविधांमुळे रुग्णसेवेवर ताण
By admin | Updated: May 29, 2015 00:07 IST