शेगाव (जि. बुलडाणा): शेगाव शहरानजिक असलेल्या रोकडिया नगरमधील सप्तश्रुंगी मंदिरात गुरुवारी पहाटे चोरी झाल्याचे उघड झाले. अज्ञात चोरट्याने देवीच्या मूर्तीवरील सोन्या, चांदीचे दागिने लंपास केले असून, ही घटना येथील सीसी कॅमेऱ्यात कैद झाली आहे.रोकडिया नगर भागात असलेले सप्तश्रुंगी देवीचे मंदिर हे अल्पावधीतच भक्तांसाठी श्रद्धास्थान ठरले आहे. शहरासह ग्रामीण भागातील भक्तांचा या मंदिरात मोठा राबता असतो. मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात चांदीचे छत्र व देवीच्या अंगावर दागिने चढविण्यात आलेले आहेत. गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश करून गाभाऱ्याचा कडीकोंडा तोडला व मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीचे तीन छत्र अंदाजे किंमत ३० हजार व सोन्याची पोथ किंमत ७ हजार असा ३७ हजारांचा माल लंपास केला आहे. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थापकांकडून शेगाव शहर पोलिसांमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीएसआय वाघमोडे हे करीत आहेत. दरम्यान, या मंदिरातील सीसी कॅमेऱ्यासोबत अज्ञात चोरट्याने छेडछाड केल्याची बाब समोर आली आहे.