बुलडाणा : गत चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर पावसाचे आगमन झाले. यामुळे कोमेजलेल्या पिकांना जीवनदान मिळाले.
सलग पाच दिवस पाऊस बरसल्यानंतर सहाव्या दिवशी पावसाने उघडीप दिली. मागील तीन दिवसांपासून पावसाची दडी आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. रिपरिप पावसाच्या वातावरणानंतर एकाएक कडाक्याचे ऊन तापायला लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. नागरिकही हैराण झाले आहेत. त्यातच पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. वारंवार बदलत्या वातावरणाने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
ऑगस्टमध्ये सर्वांत कमी पाऊस
जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीलाच चांगला दमदार पाऊस पडला होता. तर जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती.
या महिन्यात २१ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्याने सर्वाधिक पावसाची नोंद झाली; मात्र ऑगस्ट महिन्यात सर्वांत कमी पावसाची नोंद झाली. तीन दिवस कोरडे गेले.
वातावरण बदलले; काळजी घ्या...
गत तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, काळजी घेण्याची गरज आहे. त्यातच डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने आणखी सतर्कता बाळगावी. अनेक साथीचे आजार बळावत असून, गरज पडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कोठे किती पाणीसाठा?
प्रकल्प पाणीसाठा
(दलघमी) (टक्क्यांत)
खडकपूर्णा ५१८़ १९ ३६.२८
नळगंगा २८७.८५ २७.७७
पेनटाकळी ५५४.२० ३६.३०