बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमध्ये होणार्या अस्वच्छतेकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे एसटीतून प्रवास करणार्या प्रवाशांना याचा कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागासह महानगरामध्ये जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून असते. सातत्याने तिकिटाचे दर वाढले तरी केवळ महामंडळाच्या नावाने कुरकुर करीत सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसलाच प्राधान्य देतो; मात्न बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमुळे नाइलाज होतो. ग्रामीण भागात धावणार्या एसटी बसकडे तर कोणाचेही लक्ष नसते. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येता त. ग्रामीण भागात जाणार्या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे प्रवाशांना अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर हा वास सहन होत नसल्याने एसटीत उलट्या होतात. याला ग्रामीण भागात प्रवाशांनीच एक पर्यायी शब्द शोधून काढला आहे. एसटीत उलट्या होणे म्हणजे एसटी लागण असे म्हटल्या जाते. महामंडळाच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासाठी प्रवाशांनीच आपली समजूत काढल्याचे यावरून दिसते.बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकार्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या उलटीने माखलेल्या असतात. व्हेपर्स, चिप्स तसेच गुटख्याच्या पुड्या खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठय़ा प्रमाणात धूळ साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच विडी-सिगारेटचे मनसोक्त झुरके घेताना दिसतो. गर्दीने खचाखच भरलेल्या अशा गाड्यांमध्ये येणार्या विशिष्ट दर्पाने जीव घुसमटून जातो. याकडे एसटी प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळेच गरिबांची लोकवाहिनी असलेली एसटी बस आज घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. देशभरात स्वच्छता मिशन सुरू झाले असून, एसटीनेसुद्धा मिशन स्वच्छता सुरू करण्याची गरज आहे.
एसटी बरबटली घाणीने
By admin | Updated: November 6, 2014 23:19 IST