लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बाजारात सर्वाधिक विकले जाणारे सोयाबीन तेल दोन महिन्यांपासून किरकोळमध्ये प्रतिकिलो २० ते २२ रुपयांनी वाढून १२२ तर शेंगदाणा तेल १४८ रुपयांवर पोहोचले आहे. या दरवाढीने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे.
सर्वच तेलाच्या किमती २० ते २५ रुपये किलोने वाढल्या आहेत. किमती आणखी किती वाढतील, असे सांगणे कठीण असल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे मत आहे. गेल्या दोन महिन्यांत सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो २२ रुपये, तर सूर्यफूल तेल २५ रुपयांनी वाढले आहे. दुसरीकडे सोयाबीनला जास्त भाव मिळत नसताना तेलाचे भाव का वाढत आहेत, अशी ओरड सुरू आहे. १०० किलो सोयाबीनपासून १७ ते २२ किलो तेल निघते आणि उर्वरित ढेप तयार होते. पण यंदा ढेपेला देशविदेशात मागणी नाही.त्यामुळे एक क्विंटल सोयाबीनला चार हजारांच्या आसपास भाव मिळत आहे. विदर्भात ८० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. उर्वरित टक्केवारीत सर्व तेलांचा समावेश आहे.
सोयाबीनचे दर वाढल्याने सर्वच क्षेत्रातून ओरड सुरू आहे. शिवाय दर नियंत्रणात आणा आणि साठेबाजांवर कारवाई करा, अशी मागणी ग्राहक संघटनांकडून केली जात आहे.
सोयाबीन उत्पादनात घट
चालू वर्षात कमी आलेले सोयाबीनचे पीक, आयात व निर्यातीत तफावत आणि जागतिक बाजारात चीनकडून होणारी भरमसाट खरेदी ही दरवाढीची मुख्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भारतात केंद्र सरकारने पामतेलावर १० टक्के आयात शुल्क कमी केले, पण मलेशियाने निर्यातीवर ८ टक्के निर्यात शुल्क वाढविल्याने देशात आयात महाग झाली आहे. त्याचा फटका पामतेलाला बसला आहे.
गेल्या काही दिवसात सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसाधारण गृहिणींना स्वयंपाकातील वापरात काटकसर करावी लागत आहे. तसेच कुटुंबांच्या गरजांवरही परिणाम होत आहेत.
- प्रांजली वानखडे, गृहिणी, बुलडाणा
सोयाबीन तेलाची किंमत वाढत आहे. ती आणखी किती वाढेल, याचा अंदाज नाही.
- संताेष इंगळे, किराणा दुकानदार,बुलडाणा