बुलडाणा : राज्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयके सुलभ रितीने पारित होण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी स्मार्ट टीचर स्वास्थ्य योजना टप्प्या-टप्प्याने लवकर सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. राजीव गांधी सैनिकी शाळा, बुलडाणा येथे ८ मे रोजी आयोजित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक जिल्हा व्यवसाय व तंत्र शिक्षण आणि समाज कल्याण विभागाच्या शिक्षण विभागातील पदाधिकार्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक एस.एम. कुळकर्णी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक सोनोने, शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग, अधीक्षक वेतन पथक माध्यमिक संतोष कांबळे, अधीक्षक वेतन पथक प्राथमिक अजय कदम, राजीव गांधी सैनिकी शाळेचे संचालक विश्वनाथ माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण विभागातील व्यक्तिगत किंवा सामूहिक विविध समस्या प्रशासन व शिक्षक संघटनेच्या चर्चेतून समुपदेशाने सोडविणे शक्य असल्याचे सांगून गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक दोन महिन्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा घेण्यासंबंधी निर्देश यावेळी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिले. शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकासंबंधी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचार्यांनी सर्व त्रुटींची पूर्तता केल्यानंतर दोन महिन्याच्या आत देयक अदा करण्याची कार्यवाही करण्यासंबंधी निर्देश यावेळी संबंधिताना दिले. दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन व्हावे, यासाठी आदर्श प्रणाली तयार करून त्यासंबंधीची कार्यवाही करावी, असेही निर्देश यावेळी दिले. शाळेतील विद्युत देयक अदा करण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून निधी उपलब्ध करण्यासंबंधी कार्यवाही करण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
स्मार्ट टीचर स्वास्थ्य योजना राबविणार - पाटील
By admin | Updated: May 9, 2016 02:49 IST