मेहकर (जि. बुलडाणा) : तालुक्यात महसूल प्रशासन विभागाने अवैध उत्खनन व वीटभट्टीचालकांवर कारवाई करण्यास कंबर कसली आहे. तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथे अवैध वीटभट्टी चालविणार्या ११ जणांवर तहसीलदार निर्भय जैन यांनी २५ फेब्रुवारी रोजी कारवाई केली असून, त्यांना ६ लाख १४ हजार ४00 रुपये दंड आकारला आहे. तालुक्यात विनापरवाना रेती, मुरुम उत्खनन, वीटभट्टी सुरु असल्यामुळे महसूलचे नुकसान होत आहे. तहसीलदार निर्भय जैन यांनी याकडे लक्ष देऊन अवैध रेती, मुरुम वाहतुकीवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. या अवैध उत्खननाबरोबरच तालुक्यात अवैध वीटभट्टी सुरु असल्याचीही माहिती तहसीलदारांना मिळाली. त्यावरून त्यांनी अवैध वीटभट्टीचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने अवैध वीटभट्टीचालकांचे धाबे दणाणले आहे. देऊळगाव साकर्शा येथे सुरू असलेल्या अवैध वीटभट्टीचालक ११ जणांवर तहसीलदार निर्भय जैन यांनी धडक कारवाई करून त्यांना ६ लाख १४ हजार ४00 रुपये दंडाचा आदेश पारित केला आहे. त्यामध्ये देऊळगाव साकर्शा येथील शे.नासिर शे.हुसेन यांना ६४ हजार रुपये, सादीलखॉ अफजलखॉ ३८ हजार ४00 रुपये, अरुण एकनाथ गायकवाड ६४ हजार रुपये, गजानन विठोबा आल्हाट ५१ हजार २00 रुपये, सुधाकर एकनाथ गायकवाड ६४ हजार रुपये, वैजीनाथ किसन तोंडे ६४ हजार रुपये, पुरुषोत्तम पांडुरंग नवत्रे ३८ हजार ४00 रुपये, अनिसखा मुसाखा पठाण ६४ हजार रुपये, चुनीलाल भिकाजी गुजरे ८९ हजार ६00 रुपये, विठ्ठल गंगाराम बघे १२ हजार ८00 रुपये, शुद्धोधन पुंडलिक वानखेडे ६४ हजार रुपये असा एकूण ६ लाख १४ हजार ४00 रुपये दंडाचा आदेश पारित करण्यात आला आहे.
अवैध वीटभट्टीचालकांना सहा लाख रुपये दंड
By admin | Updated: February 27, 2015 01:23 IST