पोलिसांनी चिरडले आंदोलनबुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सरणावर बसून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी किसन सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पण किसान सेनेचे हे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वात विभागप्रमुख अनिल जगताप, सुभाष गिरी, सीताराम जगताप, मुक्त्यारसिंग इंगळे यांनी हे आंदोलन केले. परंतु, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन चिरडले. युपीमध्ये भाजप सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले; पण महाराष्ट्रात भाजप सरकार हे आमदारांचे पगार व सातवा वेतन आयोग लागू करण्यात धन्यता मानत आहेत; पण कर्जमुक्तीचा चेंडू केंद्राच्या पारड्यात ढकलून जबाबदारी झटकत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत कोणी कितीही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांचा आवाज दबू देणार नाही, असा इशाराही यावेळी किसान सेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.सदर आंदोलन हे खासदार प्रतापराव जाधव व जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत व शिवसेनेचे संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.