धाड (जि. बुलडाणा): विठुरायाचे नामस्मरण करीत दरवर्षी लाखोंच्या संख्येने शेतकरी पंढरीची वारी करतात. जशी मनापासून भक्ती करता, तशी आपली ताकद एकवटून केवळ एकवेळ दिल्ली दरबारी लाखोंच्या संख्येने दिंडी काढा आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी येथे केले. प्रहार संघटनेच्यावतीने ५ मार्च रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आ. बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला त्यांनी संबोधित केले. व्यासपीठावर संघटनेचे जिल्हाप्रमुख वैभवराजे माहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, डॉ. दीपक धोटे, साहेबराव मोहिते, सुरेश सोनुने, कलीम जमदार, दीपक मालवे, शिवनारायण पोफळकर, शिवाजी परमेश्वर, अपंग सेलचे नामदेव डोंगरदिवे, श्रीमंत राऊत, भगवान जाधव, गुलाबराव गुजर, बबन ठाकरे यांची उपस्थिती होती. मी शेतकर्यांच्या हक्कासाठी लढत आहे. या लढाईत प्राण गेले तरी चालेल, मात्र स्वामिनाथन आयोग लागू झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगून आमदार कडू म्हणाले, राज्यात साडेतीन लाख शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे. हे शासन सत्तेच्या लायक नाही. वेगवेगळय़ा झेंड्याखाली लोक एकत्र येतात. याचाच अर्थ जात, धर्म पाळला जातो. पूर्वी मुद्दय़ावर निवडणुका लढविल्या जात होत्या; आता जातीपातीवरच लढल्या जात आहेत. पाकिस्तानकडून होणारे हल्ले परवडले; परंतु जात-धर्माच्या नावाने परंपरा सुरू राहणे घातक आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विषय युवकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे, असे आवानही त्यांनी केले. यावेळी डॉ. दीपक धोटे, राणा संजय इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन सुनील वाघ यांनी केले. आभार साहेबराव मोहिते यांनी मानले.
स्वामिनाथन आयोगासाठी शक्ती दाखवा- कडू
By admin | Updated: March 7, 2016 02:29 IST