जिल्हा नियोजन समितीची बैठक २५ जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये आमदार श्वेता महाले यांनी चिखली शहरातील राऊतवाडी ते नगरपालिका कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव गेल्या नऊ महिन्यांपासून पाठविलेला आहे. परंतु, अद्याप त्याला मान्यता देण्यात आलेली नाही. अनेकदा पाठपुरावा करूनही मान्यता का देण्यात आली नाही, हा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, रस्त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलाच नसल्याचे स्पष्ट झाले. सुमारे ९ महिने उलटूनही जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत प्रस्ताव न पोहोचल्या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली. पालकमंत्री ना. डॉ. शिंगणे यांनी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सोबतच प्रस्तावास विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने रस्ता काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रस्त्याचा प्रस्ताव सादर न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शो-कॉज बजावणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST