मेहकर आगारातील एसटी सेवा डिझेल उपलब्ध नसल्यामुळे अडचणीत सापडली आहे. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊन आगाराचे उत्पन्न बुडाले आहे.
एकीकडे जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न देणाऱ्या मेहकर आगाराची आजची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच नियोजन होत नसल्याने वेळेवर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. डिझेलची कमतरता येत असल्याने आगाराच्या उत्पन्नावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. बुधवारी सकाळपासूनच आगारात डिझेल उपलब्ध नसल्याने लांब पल्ल्याच्या काही गाड्या आगारातून गेल्याच नाही. डिझेल नसल्यामुळे अनेक बसेस बंद होत्या. मात्र चालक-वाहक ड्युटीवर येऊन बसलेले होते. मेहकर आगारातील एसटी बस गाड्यांना डिझेल नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसस्थानकाच्या पासून २०० मीटर अंतरावर नो पार्किंग झोन असताना बस स्थानकाच्या शंभर मीटरच्या आत अवैध खाजगी वाहने अवैध वाहतूक करतांना दिसून आले. यासंदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
निधीअभावी डिझेलची बुकिंग झाली नाही. त्यामुळे काही एसटी बस गाड्या जाऊ शकल्या नाही.
-रणवीर कोळपे, आगार प्रमुख, मेहकर.