शेगाव-पंढरपूर पालखी मार्गाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रस्त्याचा दर्जा पाहण्यासाठी इंजिनिअर नेमलेले आहेत. रस्ता खराब झाल्यास ठेकेदाराला चार वर्षे दुरुस्ती करणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे रस्ताकाम अजून पूर्ण झाले नाही. ८ ते १० महिन्यांचा कालावधी झाला नाही, तर या रस्त्यावर तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. सुलतानपूर, वडगाव तेजन, शारा, लोणार, अजीसपूर गावाजवळील रस्त्यावर जागोजागी तडे गेल्याने दुरुस्ती सुरू झाली आहे. यामुळे एमएसआरडीसीचे अधिकारी रस्ता काम सुरू असतानाच याकडे लक्ष देत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सुमारे ४३० किलोमीटरच्या शेगाव-पंढरपूर या महामार्गावर सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. सुलतानपूर ते मंठा या महामार्गावर काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याला जागोजागी तडे गेले आहेत. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते परतूर येथे मोठा गाजावाजा करून या रस्ताकामाचा प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हा महामार्ग राज्यात माॅडेल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला होता. हा पालखी मार्ग मंजूर केल्याचे श्रेय विदर्भ व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी घेत होते. पण आता असे निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाईसाठी लोकप्रतीनिधी पुढे येतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महामार्ग राज्यात मॉडेल ठरणार का?
रस्त्यावर जागोजागी थीगळ लावल्याने हा महामार्ग राज्यात माॅडेल ठरेल काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या महामार्गावरच्या कामांकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.