- अनिल गवईखामगाव:- 'सबसे अच्छा मानव वह है जो मानव जाति की सेवा करता है!' या ओळी कृतिशीलतेतून प्रत्यक्षात उतरवित मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांच्या सेवेचा अनोखा पायंडा पाडल्याचे दिसून येते. विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिन महोत्सवानिमित्त विदर्भ,मराठवाडा,आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या विदर्भ पंढरी शेगावच्या दिशेने निघालेल्या आहेत. विदर्भ पंढरीच्या वाटेवर असलेल्या या दिंड्यांची मनोभावे सेवा करण्यासाठी विविध समाजपयोगी संस्था आणि वारकरी असतानाच सर्वधर्मसमभावाचा परिचय देत मुस्लिम बांधवांकडून 'सेवा परमो धर्म' हा मंत्र कृतीत उतरविण्यात येत आहे. शेगावच्या प्रवेश प्रवेश द्वारावरच भाविकांसाठी चहा-नाश्ता फराळ आणि गुलाबाचे सरबत आदी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारकर्यांसाठी मोफत दवाखानाही मुस्लिम समाज बांधवांकडून सज्ज ठेवण्यात आला आहे. अतिशय आपुलकीच्या या पाहुणचारामुळे वारकरीही भारावले जात आहेत. शनिवारी सायंकाळपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याचा मनोदय मुस्लिम बांधवांनी व्यक्त केला आहे. हाजी इमरान यांच्या मार्गदर्शनात मौलाना आबिद, साबीर शेख, मोलाना इंजमाम, शोएब भाई, मौलाना हबीब, अब्दुल कादिर, मौलाना रशीद भाई, गुलशन भाई, असलम भाई ,रियाज जमादार डॉक्टर नवाब कुरेशी, अमिन भाई मौलाना रियाज भाई,आदी वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटताहेत.
पृथ्वीवरील सर्वच एकाच ईश्वराची अल्ल्हाची लेकरे आहेत.कोणताही धर्म तिरस्काराची शिकवण देत नाही. सेवा हाच प्रत्येक धर्माचा आधार आहे. भाविकांच्या सेवेतून सर्वधर्म समभावाचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे.
- हाजी इमरान, समाज सेवक
संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दिंडीत सहभागी झालो. मुस्लिम बांधवांकडून करण्यात आलेल्या सेवेमुळे आपण भारावलो आहोत.
- गजानन सूर्यवंशी, वारकरी चिचखेडा,तालुका जामनेर जिल्हा जळगाव