संग्रामपूर (जि. बुलडाणा) : शेतकर्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करा, शेतकर्यांना प्रती एकरी ५0 हजार रुपये नगदी स्वरूपात मदत द्या, कृषीपंपांचे वीज बिल १00 टक्के माफ करा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात ३ नोव्हेंबरला संग्रामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला. संग्रामपूर बस स्टॅण्डपासून दुपारी एक वाजता सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत नेल्यावर मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकर्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला. आपल्या समस्या आपणच सोडवायच्या असतात, त्याकरिता शेतकरी व शेतमजुरांनी एकत्र होऊन लढा द्यावा, असे आवाहन प्रशांत डिक्कर यांनी उपस्थित शेतकर्यांना केले, तसेच कैलास फाटे यांनीसुद्धा उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य कार्यकारिणीचे सदस्य गिरधर देशमुख, सुधीर देशमुख, राजू वाकोडे, उमेश मोरखडे, अनिल मिरगे, संतोष गाळकर, समाधान भातुरकर, सोपान खंडारे, सुरेश राखोंडे, विनोद खिरोडकर, ज्ञानेश्वर गोल्हर, राहुल पाखरे, गणेश वैतकर, नीलेशनाथ पाटील व अन्य पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांंसह हजारोंच्यावर शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शेतकर्यांनी यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत दुष्काळी मदत त्वरेने देण्याची मागणी केली.
संग्रामपुरात ‘स्वाभिमानी’चा मोर्चा
By admin | Updated: November 4, 2015 02:54 IST