खामगाव : पैशाच्या लालसेपोटी सुनेची हत्या करणार्या सासर्यास येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा निकाल १0 मार्च रोजी न्यायाधीश एम. एम. अग्रवाल यांनी दिला. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील हरिभाऊ घाईट यांची मुलगी पुष्पाचा विवाह २३ मार्च २00६ रोजी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील सुनील हरिभाऊ टेकाडे याच्यासोबत झाला होता. दरम्यान, पुष्पाच्या माहेरच्यांनी त्यांची शेती विक्रीला काढली असताना सासरकडील मंडळीने ९ मार्च २0११ रोजी हिवरखेड येथे येऊन ४0 हजार रुपयांची मागणी केली. सदर मागणी पूर्ण न झाल्याने त्याचा राग घरी गेल्यानंतर पुष्पा हिच्यावर काढण्यात आला. माहेरहून पैसे आणण्याच्या मुद्दय़ावर वाद घालून सासरा हरिभाऊ टेकाडे याने तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. यानंतर जखमी पुष्पा टेकाडे हिला नारायण टेकाडे व दिगंबर टेकाडे यांनी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृतक पुष्पाचे वडील तसेच हिवरखेड सरपंच मनोहर पुंडकर हे दवाखान्यात गेले असता, त्यांना पुष्पाच्या अंगावर जखमा आढळल्या. यानंतर या घटनेची फिर्याद पुष्पाचे वडील समाधान घाईट यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून पोलिसांनी मृतकाचा सासरा हरिभाऊ टेकाडे, पती सुनील टेकाडे, सासू प्रमिला टेकाडे अशा तिघांविरुद्ध भादंविच्या कलम ३0२, ४९८ अ, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. यानंतर सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक एल. एन. तडवी व पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शामदे यांनी केला. हे प्रकरण खामगाव येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीकरिता दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हरिभाऊ टेकाडे याच्या कपड्यावरील तसेच मृतकाच्या अंगावर असलेल्या कपड्यावरील तसेच अंथरुणावरील रक्ताचे नमुने तपासण्यात आले. सुनावणीदरम्यान १४ जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. साक्षी-पुराव्यांनी हरिभाऊ टेकाडे याच्यावर आरोप सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, तर इतर आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. या प्रकरणात सरकारी वकील अँड. टी. एम. हुसेन यांनी काम पाहिले. या बहुचर्चित खटल्याच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले होते.
सुनेच्या खूनप्रकरणी सासर्यास जन्मठेप
By admin | Updated: March 12, 2015 01:53 IST