सिंदखेडराजा : बोगस खतांचा काळाबाजार एकीकडे होत असतांना दुसरीकडे उगवण शक्ती ५0 टक्के पेक्षा कमी असलेल्या सोयाबीन बियाण्याची विक्री करुन शेतकर्यांची सर्रास फसवणूक होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. काही कृषी सेवा केंद्रावर गत आठवड्यात अधिकार्यांनी धाड टाकली. परंतु साटेलोटे करुन सदर प्रकरणे दडपल्याची चर्चा जनमाणसात सुरु आहे. अगोदरच पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात पेरणीसाठी कपाशी, सोयाबीन, मूग, ज्वारी, उडीद ही महागडी बियाणे आणि महागडी खते आणून साठविली आहेत. यात बियाण्यांची आणि खताची प्रतवारी काय हे शेतकर्यांना लवकर कळत नाही. काही कृषी सेवा केंद्रातून हैद्राबाद येथून काही कंपनीचे सोयाबीन बियाणे विक्री झाले असून, त्याची उगवण शक्ती फक्त ५0 टक्केच आहे, अशी तक्रार शेतकर्यांनी कृषी विभागाकडे केली होती. त्याची दखल घेत मागील आठवड्यात जिल्हा कृषी अधिकारी भराड, तालुका कृषी अधिकारी सानप, गिर्हे यांनी कृषी सेवा केंद्रावर धाडी टाकल्या. बियाणे तपासले, तेव्हा त्याची विक्री किती झाली याचा ताळामेळ कोठेच दिसून आला नाही. काही दुकानावरील खताची विक्री सुद्धा त्यांनी बंद केली. परंतु कारवाई काय झाली, याचे उत्तर अधिकार्यांनी देण्याचे टाळले.
बोगस बियाण्यांची विक्री
By admin | Updated: July 7, 2014 22:42 IST