खामगाव : सुरुवातीला कमी आता दमदार पाऊस झाल्याने पीक परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र ऐनवेळी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणार्या युरीयाच्या कमतरतेमुळे शेतक-यांची युरीया मिळवण्यासाठी धावपळ सुरुच आहे. काल युरीया वाटप झाल्यानंतर आज शहरातील कृषी केंद्रावर परत युरीया नसल्याचे फलक आढळून आले.खामगाव तालुक्यात ७३ हजार ७0४ हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपाचा पेरा झाला आहे. यामध्ये सोयाबीन सर्वाधिक ३१ हजार ७६0 हेक्टर, कपाशी २७ हजार २0 हेक्टर, तूर ७ हजार ५0, ज्वारी ३ हजार १५0, मका १५१0, मूग ११३0, उडीद ६६0, तीळ ७१0, सूर्यफूल ८0, भुईमूग २४ तर बाजरीचा ६१0 हेक्टरवर पेरा झाला आहे. सद्यस्थितीत सोयाबीन व कपाशीला युरीया देण्याची शेतकर्यांची धावपळ सुरु आहे मात्र ऐनवेळी युरीयाचा तुटवडा जाणवत आहे. खामगाव तालुक्यात १ हजार क्विंटल युरीयाची मागणी आहे. खामगाव तालुक्यातील शेतक-यांबरोबर इतर ठिकाणचे शेतकरीही खते खरेदीसाठी येतात. परिणामी खामगावात नेहमीच बाजारात गर्दी आढळून येते. कृषी केंद्रावर युरीया नसल्याचे भासवून कृषी केंद्र संचालक मनमानीने युरीयाची विक्री करीत होते. मात्र ११ सप्टेंबर रोजी तालुक्यात १५0 टन युरीया उपलब्ध झाला. या युरीयाचे ६ कृषी केंद्रावर वाटप करुन प्रति शेतकर्यांना २ बॅग या प्रमाणे युरीयाचे वितरण करण्यात आले. शेतक-यांची युरीयासाठी गर्दी वाढत असल्याने कृषी केंद्र धारकांनी दुकानासमोर युरीया नसल्याचे फलक लावून दिले आहेत. ज्या शेतक-यांच्यामुळे कृषी केंद्र चालतात त्यांच्याशी बोलण्यासही या संचालकांना वेळ नसल्याचे यातून दिसून येते. आता पुन्हा कधी युरीया उपलब्ध होईल याकडे शेतक-यांचे लक्ष लागले आहे.
खतासाठी धावपळ सुरुच
By admin | Updated: September 14, 2014 00:30 IST